मुंबई – आरपीआयच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावळे आठवले यांनी आगामी निवडणुकीनंतर केंद्रात भाजपा सरकार आल्यावर आम्हाला मंत्रीपद द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच सेना-भाजपा युती झाली त्याबद्दल आनंद आहे. मात्र या युतीबद्दल आम्हाला विचारणा करण्यात आली नाही. युतीच्या घोषणे वेळी आम्हाला बोलावण्यात आलं नाही.
याबद्दल आमच्या समाजात नाराजी आहे. लोकसभेच्या दोन जागा आम्हाला द्याव्या, एक शिवसेनेने द्यावी तर एक भाजपने द्यावी अशी मागणी आठवलेंनी केली आहे. मुंबईत दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई यामधील एक लोकसभा जागा तर लातूर,रामटेक,सोलापूर यापैकी एक जागा आम्हाला देण्यात यावी, साताऱ्याची जागा आम्हाला नको. तसेच विधानसभेच्या 10 ते 12 जागा आम्हाला द्याव्यात असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आम्हाला निरोप येत आहेत पण आम्ही मोदींसोबत राहणार आहोत. तसेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरपीआयच्या मागण्या त्यांच्या समोर मांडणार आहोत.
आम्हाला अनुल्लेखाने मारू नये, तुम्ही दोघे एकत्र येऊन आम्हाला वेगळे ठेवू नका. ज्या शिवसेनेने भाजपावर चार वर्ष टीका केली त्यांना भाजपने जवळ केले आहे. जवळ करायला हरकत नाही पण सेना- भाजपा आमदारांच प्रीती भोजन आहे तिकडे आम्हाला बोलावले नाही,
त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी फोन केला तरी जाणार नाही जोपर्यंत आमच्या जागा मान्य होत नाहीत तोपर्यंत जाणार नाही. तसेच मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत पण भाजपाची आणि माझी प्रीती जुळली नाही असा टोलाही यावेळी आठवलेंनी लगावला आहे.
COMMENTS