मुंबई – कोकणात पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे दोन नेते शिवसेनेत असूनही एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आता मात्र त्यांच्यात दिलजमाई झाल्याचं स्पष्ट झालंय. झाले गेले विसरुन जात आहे. मी अनंत गीते यांच्यासाठी काम करणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या विजयाचा शिल्पकार मी असेन या शब्दात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाद मिटल्याचं सांगितलं आहे.
कोकणात गीते आणि कदम यांच्यातला वाद नवा नाही. दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मात्र गेल्या काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वी अनंत गीते यांनी एका सभेत 2014 मध्ये रामदास कदम यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप केल्याने पुन्हा खळबळ उडाली होती. त्यावरुन पुन्हा दोन नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता होती. मात्र कदम यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रय़त्न केलाय.
झी 24 तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात रामदास कदम यांनी अनंत गीते यांच्या विजयासाठी जोरदार प्रय़त्न करणार आणि त्यांना विजयी करणार असा दावा केला आहे. 2014 मध्ये आपण गीतेंच्या विरोधात काम केलं नाही. मात्र त्यांचा प्रचारही केला नाही. आपण गीतेंचा प्रचार करणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानुसार 2014 च्या निवडणूक प्रचारात मी कोकणात फिरकलोच नाही. पक्षाने मला राज्यभरात प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यानुसार मी काम केले असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच गीते यांनीही आपल्या विरोधात गुहागरमध्ये काम केले होते असाही आरोप केला.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केल्यामुळे विरोधकांचं चांगलंच फावलं होतं. रामदास कदम यांचा गुहागरमध्ये पराभव झाला होता. तर मोदी लाटेतही गीते निसटत्याच फरकाने विजयी झाले होते. त्यामुळेच आता दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय अशी चर्चा आहे. गीतेंना पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांची लढाई सोपी नाही. त्यामुळे त्यांना कदम यांच्या मदतीची गरज आहे. तर दुसरीकडे कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनाही तिथे गीतेंच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे मुलाच्या राजकीय लॉन्चिंगसाठी का होईना कदम यांनी गीतेंशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता ही राजकीय दिलजमाई किती काळ टिकते आणि त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो हे येणा-या काळातच स्पष्ट होईल.
COMMENTS