लातूर – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश कराड यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. याबाबत त्यांनी अखेर मौन सोडलं असून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उमेदवारी दिली. त्यांच्या आदेशानंतर फॉर्म भरला. पण ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक पैसे मागण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला, अशी माहिती रमेश कराड यांनी दिली आहे.
दरम्यान पंकजांसोबतचं जे नातं आहे, ते रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळे मनाला वाटायला लागलं की कुठे तरी आपण चुकलो आहोत त्यामुळेही हा निर्णय घेतला असल्याचं कराड यांनी म्हटलं आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. तसेच कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत भाजपात काम केलं आहे आणि भविष्यातही करणार असल्याचं रमेश कराड यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचं अस्तित्व लातूर जिल्ह्यात नगण्य आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मी राष्ट्रवादीत आल्यामुळे खुश होते. पण कार्यकर्त्यांचा आनंद हा क्षणिक होता. कारण, राष्ट्रवादी पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी चालत नाही, नेत्यांसाठी चालतो. जे पैसे मागण्यात आले, ते देणं शक्य नव्हतं, माझे वडील आजही शेती करतात, ते काही कारखानदार नाहीत, असी टीकाही यावेळी कराड यांनी केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
COMMENTS