औरंगाबाद – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेना खासदारानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दानवे यांनी युती धर्म न पाळता आपल्या जावयाला मदत केली असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यामुळे यानिवडणुकीत दानवेंनी जाधव यांनाच मदत केली असल्याचं म्हटलं आहे. ‘दानवेंनी प्रचाराच्या काळातच औरंगाबादच्या रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जावयाला मदत केली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं उघडपणे काम केलं.
जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा’ अशी तक्रार खैरे यांनी अमित शाह यांना भेटून केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले असून, संघानेही दखल घेतली असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS