मुंबई -“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. त्यांच्यावर आता टिकेची झोड उठू लागली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेत “जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे,” असं म्हटलं आहे.
‘शेतकरी आंदोलनाबाबत दानवे यांनी केलेलं विधान पोरकट आहे. त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी अशी बातमी सोडायची की तीच ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे, असा खोचक टोला अजित पवार लगावला आहे. तसंच, कदाचित काही दिवसांत तुम्हाला ते मी असं बोललोचं नव्हतो, असं स्पष्टीकरणही ऐकायला मिळतील. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असं विधान करणं तथ्यहीन आहे, असं म्हणत अजित पवारांनी त्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
COMMENTS