वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत शंका – संजय राऊत

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत शंका – संजय राऊत

मुंबई – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली होती, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या भाषणात अडथळा येऊ नये, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको या विचाराने वाजपेयी यांनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला किंवा त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली असल्याची शंका संजय राऊत यांनी ‘सामना’तील लेखात उपस्थित केली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरा केलेल्या स्वातंत्र्यदिनावरही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी घुसलेले अतिरेकी पकडण्यात पोलिसांना यश आले की समजावे, स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. या वेळीही परंपरेप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उधळून लावण्यासाठी दिल्लीत घुसलेल्या १० अतिरेक्यांना अटक झाली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा पकडला गेला. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बेडरपणे स्वातंत्र्य दिन साजरा केला असा टोला राऊत यांनी सामनातून लगावला आहे.

COMMENTS