स्वाभिमानी शेतकरी संघटनाही महाआघाडीत,  रविकांत तुपकरांनी घेतली शरद पवारांची भेट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनाही महाआघाडीत, रविकांत तुपकरांनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून सर्वच मित्रपक्षांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज सकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी तुकपकर यांची बैठक सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माढ्यात एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मतदारसंघातून शरद पवार हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपसोबत या मतदारसंघात स्वाभिमानीचंही आव्हान निर्माण होऊ नये म्हणून पवार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात पक्षाची तब्बल पाच तास गुप्त बैठक झाली होती. स्वाभिमानी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ते महाआघाडीत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान काल स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज पुन्हा रविकांत तुपकर यांनी पवारांची प्रत्यक्षात भेट घेतली आहे. हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धा या तीन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हव्या आहेत. त्यामुळे या तीनही जागा स्वाभिमानीसाठी सोडल्या जाणार का ? किंवा यावर काय तोडगा निघणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS