मुंबई – भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला त्यावरुन शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे. आपण काय करतो यांचे भान भाजपच्या नेत्यांना नाही का ? या प्रकरणावरुन आता भाजप आणि रविंद्र चव्हाण माफी मागणार का ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. काँग्रेसनंही या प्रकरणी भाजप आणि चव्हाणांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसंच खासदार संभाजी महाराज यांनीही या प्रकरणी बोलावे असं आवाहनं काँग्रेसनं केलंय.
काही दिवसांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख यांनी रायगडावरील मेघडंबरीमध्ये जाऊन चुकीच्या पद्धतीने फोटो काढले होते. त्यावेळीही रितेश देशमुखयांच्यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून टीका झाली होती. त्यानंतर रितेश देशमुख यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यांच्यासोबत असणा-या विश्वास पाटील यांनीही माफी मागितली होती. त्यामुळे आता रविंद्र चव्हाण माफी मागणार का ? याकडं लक्ष लागलंय. गेल्याच आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती. त्यावरुनही त्यांच्यावर टीका झाली होती.
COMMENTS