कर्जत-जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीवरुन तुतू-मैमै

कर्जत-जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीवरुन तुतू-मैमै

अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त राजकारण ढवळून निघाले असताना पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावांना बक्षीस जाहीर केले. त्यानंतर राज्यभरात बक्षीस वाटपाची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बिनविरोध करणाऱ्या गावांना ३० लाखांचे बक्षीस जाहीर केल्यानतंर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी निवडणुक आयोगाकडे चौकशीची मागणी केली. त्यामुळे मतदारसंघात दोघा आजी माजी आमदारांमध्ये तुतूमैमै सुरु झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले. त्यावर राम शिंदे यांनी असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. पवार यांच्या प्रलोभनाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी राम शिंदे यांनी केली होती. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. मात्र, असंच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार- खासदार होतील, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.

त्यावर रोहित पवार म्हणाले, “गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे”.

“बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी तट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु”, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.

COMMENTS