मुंबई – भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.
‘रोहित पवार यांना कॅलक्यूलेशन समजत नाही,’ असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता रोहित पवारांनी आक्रमक उत्तर दिलं आहे.”नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली, याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं ‘अभ्यास’ करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
“GST च्या पैशाबाबत मी मांडलेल्या मतावर…’रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं’ अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांनी केल्याची बातमी मी पाहिली. नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली, याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं ‘अभ्यास’ करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी. एक गोष्ट मात्र खरीय की माझा त्यांच्याएवढा ‘अभ्यास’ नाही, पण मी वस्तुस्थिती मांडली व माझ्या कॅलक्यूलेशनचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा देतो. ते देत असताना नाराजीतून किंवा माझ्याविरोधात कुणी बोललं म्हणून नाही तर वस्तुस्थिती समोर यावी आणि शाब्दिक खेळ आणि राजकीय टीकाटिप्पणी होऊ नये म्हणून मी ही टिपणी देतोय.
#GST ची नुकसानभरपाई देताना 2015-16 हे वर्ष आधारभूत धरलं होतं. #GST मध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व करांपासून या वर्षी राज्याला मिळणारं उत्पन्न आणि त्यावर दरवर्षी 14 टक्के वाढ या प्रमाणात नुकसानभरपाई मिळणार होती. परंतु या उत्पन्नात राज्यातील महापालिकांना #LBT पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश केला नाही. कारण त्यापूर्वीच 50 कोटी ₹ पेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांचा #LBT राज्य सरकारने घाईघाईत रद्द करुन त्यापोटी महापालिकांना 3290 कोटी रुपये अनुदान दिलं आणि हा निर्णय त्यावेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्र जी फडणवीस यांनी घेतला. या निर्णयाला त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला. पण आपल्याच इतर सहकाऱ्यांना न जुमानणारे फडणवीस जी त्यावेळी विरोधकांच्या म्हणण्याकडं कसं लक्ष देतील? शेवटी त्यांनी घाईघाईत हा निर्णय घेऊन अनुदान म्हणून महापालिकांना दिलेले 3290 कोटी रुपये ही रक्कम 2015-16 च्या महसुलात परिगणित झाली नाही. परिणामी राज्याला दरवर्षी मिळणारे हक्काचे 3290 कोटी रुपये आणि त्यावर दरवर्षी 14 टक्के वाढ अशा पाच वर्षातील सुमारे 26 हजार कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं.
#LBT रद्द केल्यामुळं छोट्या व्यावसायिकांना त्यावेळी दिलासा मिळालाही असेल पण त्यामुळं आजपर्यंत राज्याचं झालेलं नुकसान हे खूप मोठं आहे. या व्यावसायिकांना आपण वेगळ्या पद्धतीनेही मदत करू शकलो असतो आणि आज होणारं नुकसान टाळता आलं असतं. पण तसं केलं नाही आणि त्यात अंतिमतः राज्याचंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता ते भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा करून, प्रसंगी भांडून ही रक्कम २2015-16 च्या महसुलात परिगणित करून घेणं आवश्यक होतं, परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हे जमलं नाही. कदाचित येणाऱ्या काळात केंद्र सरकारवर जीएसटी भरपाईचा अधिक बोजा पडू नये म्हणून त्यांनी मनापासून प्रयत्न केले नसतील.
दर दोन महिन्यांनी #GST भरपाई राज्यांना देणं गरजेचं असतानाही केंद्र सरकार मात्र खूप उशिराने देतं. ऑक्टो-नोव्हे 2019 ची भरपाई डिसेंबर ऐवजी फेब्रुवारी मध्ये एक टप्पा तर मे मध्ये दुसरा टप्पा अशी दिली गेली. डिसेंबर 2019 व जाने-फेब्रु 2020 ची भरपाई जून महिन्यात मिळाली. मार्च 2020 ची भरपाई जुलैमध्ये मिळाली तर 2020-21 च्या एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांची भरपाई अद्यापही मिळाली नाही. केंद्राकडून #GST देण्यात होणारी ही दिरंगाईही त्यांना कळायला हवी होती.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने #GST भरपाई पोटी संचित निधी मधून 34412 कोटी रु दिल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मात्र 75000 कोटी रु संचित निधीमधून दिल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी ठोकून दिलं. याला काय म्हणावं? त्यांना एक सांगायचंय की व्यक्तिगत हीत हे पक्षहितापेक्षा वरचढ व्हायला नको, अन्यथा सत्ता जाते आणि पक्षहीत राज्याच्या हितापेक्षा वरचढ व्हायला नको अन्यथा राज्य आर्थिक संकटात लोटलं जातं.
मला या विषयाचं राजकारण करायचं नाही किंवा करायची इच्छाही नाही. परंतु आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारकडून भरपाई देताना अनेक महिने उशीर होतोय. राज्यसमोर मोठं आर्थिक संकट आहे. अशा काळात दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपण केलेली चूक सुधारण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे वेळेत #GST भरपाई देण्याची व स्थानिक संस्था करापोटी माफ केलेली रक्कम आधारभूत महसुलात परिगणित करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे लावून धरावी आणि ती मान्य करुन घ्यावी.
#LBT माफ केला नसता तरी काही फरक पडला नसता, असंही त्यांनी सांगितलं, पण ते खरं नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या वर्षी जरी राज्याचा कर जास्त जमा झाला व तफावत नसली, तरी पुढील वर्षामध्ये तफावत झाल्याचे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे #LBT माफ केल्याचा काही फरक पडला नसता, हे त्यांचं म्हणणंही चुकीचं आहे. 2017-18 साठी राज्याचा कर जास्त जमा झाला होता. यामध्ये देखील ते आपली भूमिका रेटताना दिसतात. लोकसभेत 3 फेब्रुवारी 2020 रोजी विचारलेल्या एका प्रश्नाचे (लोकसभा अतारांकित प्रश्न क्र. 56 ) उत्तर देताना केंद्रिय अर्थ राज्यमंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी पहिल्या वर्षासाठी म्हणजेच 2017-18 साठी महाराष्ट्राला 3077 कोटी रु #GST च्या भरपाईपोटी दिल्याचं सांगितलं. आता एक तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री चुकीची माहिती देत असतील किंवा विरोधी पक्षनेते तरी चुकीची माहिती देत असतील असंही रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.
#GST च्या पैशाबाबत मी मांडलेल्या मतावर 'रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं' अशी टीका…
Posted by Rohit Rajendra Pawar on Saturday, August 29, 2020
COMMENTS