पवार कुटुंब आणि सध्याच्या राजकारणावर रोहित पवारांची पोस्ट !

पवार कुटुंब आणि सध्याच्या राजकारणावर रोहित पवारांची पोस्ट !

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल बंडखोरी करत भाजपला साथ दिली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं. राष्ट्रवादीतील नेत्यांनी अजितदादांचा निषेध केला तर पवार कुटुंबातही मोठी नाराजी पसरली होती. राज्यातील याच राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असल्याचं दिसत आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,

पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.

लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.

COMMENTS