मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून संताप व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली आहे. पवार संरक्षण मंत्री होते, ते 10 वर्ष कृषी मंत्री होते. त्यांच्या काळात अनेक मोठे निर्णय घेतले गेले. सुरक्षा कमी केली असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चुकीची गोष्ट वाटते. अशा प्रकारे सुडाचे राजकारण योग्य नाही. महाराष्ट्रातील जनतेने वेगळा कौल दिला म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला असेल तर ते चुकीचं वाटतं अस रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS