मुंबई – भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीतील प्रत्येक पक्ष नेमका किती जागा लढणार, हा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार, भाजप १६४ व शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढणार आहे. मित्रपक्षांना द्यावयाच्या १८ जागा भाजप स्वत:च्या कोट्यातून देणार आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटनेला 3 जागा सोडण्यात आल्या असल्याची माहिती आहे. पंढरपूर, अक्कलकोट, फलटण या जागा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच रयत क्रांतीकडून पंढरपूरच्या जागेवर सुधाकर परिचारक हे लढणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान शिवसंग्राम पक्षासाठी 4 जागा सोडल्याचा दावा विनायक मेटे यांनी केला आहे. यामध्ये वर्सोवा, किनवट( नांदेड ), चिखली ( बुलढाणा ), तर चौथी जागा काही वेळानंतर सांगितली जाणार असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. तसेच महादेव जानकर यांच्या रासपला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत, जिंतूर आणि दौड या जागांचा समावेश आहे.
तर रामदास आठवले यांनी आरपीआयला 10 जागा मिळाव्या अशी मागणी केली होती परंतु आरपीआयला 6 जागा मिळाल्या आहेत. त्या जागा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
COMMENTS