नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. परंतु या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून राहुल गांधी यांना कार्यक्रमाला बोलावण्याबाबतचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं संघाचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली असून संघाच्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं आहे याबाबतची अजून कोणतीही लिस्ट काढण्यात आली नसून तिला अजून वेळ आहे. त्यामुळे या लिस्टमध्ये कोणाचं नाव असेल हे आत्ताच सांगता येणार नसल्याचंही वैद्य यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आरएसएसनं पुढील महिन्यात ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत हा कार्यक्रम चालणार असून या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याची तयारी संघानं केली असल्याची चर्चा होती. परंतु वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी कार्यक्रमाला कोणाला बोलवण्यात येणार आहे हे स्पष्ट झालं नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS