प्रणव मुखर्जी यांच्यानंतर राहुल गांधी संघाचे पाहुणे ?

प्रणव मुखर्जी यांच्यानंतर राहुल गांधी संघाचे पाहुणे ?

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यक्रमासाठी निमंत्रण देणार असल्याची चर्चा आहे. आरएसएसनं पुढील महिन्यात ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. आरएसएसचा हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. ‘भविष्य का भारत’ या कार्यक्रमासाठी राहुल गांधी व येचुरी यांच्यासहीत अन्य राजकीय नेत्यांनाही RSS निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अनेक वेळा राहुल गांधी हे संघावर जोरदार टीका करत आले आहेत. तरीही त्यांना संघाकडून निमंत्रण दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना संघानं नागपूरमध्ये कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. प्रणब मुखर्जी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता खुद्द राहुल गांधी यांना संघाकडून निमंत्रण दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रणब मुखर्जी यांच्यानंतर आता राहुल गांधी हे संघाचे पाहुणे होणार असल्याचं बोललं जात असून राहुल गांधी हे संघाचं निमंत्रण स्वीकारुन कार्यक्रमाला हजेरी लावणार की नाही याकडे लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS