मुंबईः सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
‘मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून डेलकरांची मुंबईत येऊन आत्महत्या केली असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून डेलकर कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी, सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ऑनलाईन मिटींगमध्ये दिले आहे, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.
‘एका खासदाराला खोट्या केसेसमध्ये अडकवणे त्यांना व त्यांच्या समर्थकांना छळणे तसेच नोकरशाही, पोलीस, तपासयंत्रणा आणि स्थानिक गुंडाकडूनही त्यांची छळवणूक होणे याबाबत त्यांनी स्वतः व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. मला तुम्ही हा त्रास का देता अशी विचारणा त्यांनी केल्यावर उपरसे ऑर्डर है असे उत्तर त्यांना दिले. हा प्रकार इंग्रज काळातील छळवणुकीपेक्षाही भयंकर आहे असे डेलकर म्हणाले होते. त्याचबरोबर ते लोकसभेमध्ये आपला राजीनामा देऊन आपली व्यथा मांडणार होते. काही दिवसांपूर्वीच संसदेत मागच्या अधिवेशनातील आपल्या भाषणात त्यांनी यासंदर्भातील आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये त्यांना कशाप्रकारे खोट्या केसेसमध्ये गुंतवून बदनाम आणि अपमानित केले जाते याची कैफियत त्यांनी मांडली होती, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS