मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूस्त्रीदाक्षिण्य या सद्गुणाला राष्ट्रघातक, कुपात्री, व विकृत्ती असे संबोधून महाराजांचा अवमान करणारे सावरकर भाजपाला मान्य आहेत का ? असा सवाल विचारून छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांची सावरकर व गोळवलकर यांनी केलेली अवमानना काँग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे तसेच सावरकरांबद्दल भाजपाला आलेला कळवळा ही महाराष्ट्रात भाजपाविरहित सरकार स्थापन झाल्याच्या पोटशूळातून तसेच राजकीय कावेबाजीतून आलेला आहे, असे खणखणीत प्रतिउत्तर सावंत यांनी दिले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मध्य प्रदेश मधील सेवादलाच्या एका घटकाने मर्यादित स्वरुपात वाटप केलेल्या माहिती पुस्तिकेतील काही मजकूराचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निश्चितच समर्थन करत नाही. काँग्रेस पक्षाचा सावरकरांच्या विचारांना असलेला विरोध हा वैचारिक असून तो व्यक्तिव्देषातून खचितच नाही. सावरकरांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दलची माहिती ही अप्रस्तुत असून ती फ्रीडम अॅट मिडनाईट एका पुस्तकाच्या आधारे ती केलेली आहे. असे असले तरी कोणाचे व्यक्तिगत आयुष्य हे राजकीय चर्चेचा भाग कदापि असू नये हीच काँग्रेस पक्षाची धारणा आहे. वैयक्तिक चारित्र्यहनन हा संघाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे काँग्रेस चर्या नव्हे असे सावंत म्हणाले.
मध्य प्रदेशातील एका अत्यंत मर्यादीत स्वरुपात वाटल्या गेलेल्या माहितीपुस्तकाबद्दल अकांडतांडव करणाऱ्या भाजपाला आलेला सावरकरांबद्दलचा कळवळा हा राजकीय कावेबाजीतूनच आलेला आहे. याच माहिती पुस्तकात नमूद केलेल्या गायीबद्वलच्या व इतर सावरकरांच्या विचारांना भाजपाची व संघाची मान्यता नाही. अनेक वर्षे सावरकरांना संघ परिवाराने दूर ठेवले होते. अचानक सावरकरांबद्दल आलेले प्रेम हे महाराष्ट्रातील भाजपविरहित सरकार अस्थिर करण्यासाठी आहे. दुर्दैवाने महात्मा गांधींची शरद पोंक्षे सारखे व्यक्ती जाहीर बदनामी करत असताना त्याच व्यासपीठावर बसलेले भाजपा नेते गप्प बसून समर्थन देत असतात.
छत्रपती संभाजी महाराज यांना सावरकर आणि गोळवलकर या दोघांनीही मदिरा व मदिराक्षींसी आसक्ती असलेला नाकर्ता पुरुष असे म्हटलेले हे भाजपाला मान्य असेल परंतु काँग्रेस त्याचा निकराने विरोध करते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू द्वेषाने डोकं फिरलेला म्हणणे भाजपाला मान्य असेल काँग्रेस ला नाही. बौध्द धर्मीयांनी स्वराष्ट्रद्रोह करण्यास मागेपुढे पाहिले नाही असे म्हणणे असेल वा त्यांची राष्ट्रद्रोही प्रवृत्ती होती व बौद्ध संघ म्हणजे उपजत राष्ट्रद्रोह्यांचा संघ असे सावरकरांचे मत भाजपाला मान्य असेल, आम्हाला नाही असे सावंत म्हणाले.
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवणाऱ्या शिवाजी महाराजांनी शत्रूस्त्रीदाक्षिण्य या दाखवलेल्या अनेक पिढ्यांना आदर्शवत अशा सद्गुणाला राष्ट्रघातक, कुपात्री व विकृत्ती संबोधणारे सावरकर आम्हाला कदापी मान्य होणार नाहीत. मुस्लिम स्त्रियांवर मराठा सैन्याने बलात्कार केला पाहिजे होता व बलात्काराचा बदला बलात्काराने घेतला पाहिजे असे म्हणणारे सावरकर हे भाजपाला मान्य असतील पण आम्हाला मान्य नाहीत असे सावंत म्हणाले.
COMMENTS