मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा – काँग्रेस

मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा – काँग्रेस

मुंबई – मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा असल्याचे निदर्शक आहेत. मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याच्या सरकारच्या कुटील कारस्थानाचा हा दुसरा प्रयत्न आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मराठा मोर्चे निघाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरु झाला. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. यानंतर आता राज्यामध्ये प्रचंड मोठ्याप्रमाणात सरकाविरोधातला असंतोष निर्माण झालेला पाहिल्यानंतर सरकारच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा निश्चित दिसत असल्यामुळे जातीय ध्रुवीकरणाकरीता मराठा व अन्य समाज असा संघर्ष व्हावा असे कुटील कारस्थान सरकारतर्फे रचण्यात आले आहे असा आरोप सावंत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, या कट कारस्थानाचा पहिला भाग हा आपल्या हस्तकांद्वारे मराठा आणि दलित समाजातला संघर्ष निर्माण होण्याकरिता भीमा कोरेगावची घडवून आणलेली दंगल होता. याचाच दुसरा भाग म्हणजे मराठा आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांचे विधान आणि त्यानंतर भाजपच्या पेड ट्रोल्सनी मुख्यमंत्री विठ्ठल सेवक आहेत हे दाखवण्यासाठी ट्वीटरवर ट्रेंड चालवून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दिलेले आव्हान असेल यातूनच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न झाला.

सरकारने चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल याकरता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत उलट सरकार वेळकाढूपणा करित आहे. दरम्यानच्या सरकारने मराठा समाजाल दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारची अनास्था, जाणिवपूर्वक केलेली चालढकल आणि जुमलेबाजी यामुळे समाजातील सर्व वर्गाचा सरकारवरील विश्वास उडाला आहे हे स्पष्ट झाले आहे असे सावंत म्हणाले.

COMMENTS