मुंबई – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर खोचक टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी भैरवनाथ शुगर्सचा परवाना रद्द करून उस्मानाबादमधील दुष्काळी भागातील ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान केले असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. तसेच शेट्टी यांनी जी काही स्टंटबाजी केली ती चांगली होती पण आता परांडा भागातील शेतक-यांच्या ऊस गाळपाची तेवढी सोय करा अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.
साखर कारखानदारांनी सरकारी कायदा व धोरणांनुसार एफआरपीची रक्कम शेतक-यांना अद्याप दिली नाही त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी याबाबत कोणाचे दुमत नसल्याचंही यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते व आमदार तानाजी सावंत यांच्या परांडा येथील भैरवनाथ शुगर्सचा यंदाचा ऊस गाळप परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
उस्मानाबादमधील परांडा भागात सावंत यांचा भैवरनाथ शुगर्स कारखाना वगळता सध्या दुसरा साखर कारखाना ऊस गाळप करत नाही. त्यामुळे आता तेथील ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय कोण देणार? यंदा पाऊस कमी पडला. शेतक-यांनी आठ- दहा महिने रक्ताचे पाणी करून कसे तरी ऊसाचे पीक आणले आहे. त्यामुळे तेथील शेतक-यांच्या ऊसाचे काय करायचे असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
COMMENTS