मुंबई – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात असलेल्या विकास आघाडीत फूट पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात अंतर्गत संघर्षाची चर्चा सुरु आहे. रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्यापासून सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. अशातच इस्लामपूर नगरपालिकेतील विकास आघाडीचे पक्षप्रतोद व गटनेते विक्रम पाटील आणि नगराध्यक्ष पाटील यांच्यातील मतभेदही आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आघाडीतच फूट पडत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान पेठनाक्यावरील महाडिक पिता—पुत्रांनी आघाडीचा विचार न घेता विधानसभेच्या इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच नानासाहेब महाडिक यांच्या दोन्ही मुलांनी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे.
अशातच सदाभाऊ खोत आणि नानासाहेब महाडिक यांची गाडी एकत्रित धावत असल्यामुळे शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक आणि इस्लामपुरातील इच्छुक निशिकांत पाटील यांच्या समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडीती चित्र असंच सुरु राहिलं तर सदाभाऊंच्या आघाडीत फूट पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS