जयसिंगपूर – गेली ९ वर्षे संघटनेत होता त्यावेळी तुम्हाला राजू शेट्टी यांचे रक्त दिसले नाही काय? माढ्यात मग कुणाच्या जीवावर तुम्ही मते मागितली असा खडा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केला. नुकतेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका कार्यक्रमात मारहाण झालेल्या घटनेचे फोटो काढून मी कधी मते मागितली नाही, अशी टीका केली होती .
त्याचा समाचार घेताना प्रवक्ते अनिल पवार म्हणाले की, सदाभाऊ खोत यांना केवळ राजू शेट्टी यांच्यामुळेच मंत्रीपद मिळाले आहे. स्वाभिमानीमुळेच त्यांना खरी ओळख मिळालेली आहे. लोकसभेत विरोधक कोण आहे, याची काळजी आम्ही केलेली नाही. जोपर्यत राज्यातील कष्टकरी शेतकरी, सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आम्हाला कुणाची भिती नाही. तुम्हालाही बावची फाट्यावर मारहाण झाली होती. त्याचेेही फोटो दैनिकात प्रसिध्द झाले होते. त्या मारहाणीची फोटो दाखवूनच तुम्ही माढ्यात मते मागितला आहेत. भाजपची तळी उचलण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवला असता तर तुम्हाला जनता डोक्यावर घेऊन नाचली असती. बावची फाट्याच्या मारहाणीची ध्वनीफीत बनवूनच माढ्यात प्रचार केला होता.
केवळ भाजप नेत्यांना खूश करण्यासाठी राजू शेट्टींच्या विरोधात टीका करण्याचा सपाटा लावलेला आहे. शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटणारे महाराष्ट्र भूजल विधेयक येऊ घातले आहे. त्याला तुम्ही कुठेही विरोध केला नाही. तुम्ही गतवर्षी उसाला एफआरपी अधिक ३०० रूपयांची पहिल्या हप्त्याची मागणी केला होता. अन्यथा साखर कारखान्यांवर गुन्हे दाखल करू, अशी पोकळ वल्गना देखील केली होती. मात्र एकाही साखर कारखान्यांवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. मंत्री सुभाष देशमुख यांनीच शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे. त्यांच्यावर कारवाई का केली नाही? मार्केट कमिटीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. असे असताना शेतकऱ्यांची बाजू न घेता व्यापाऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. एकाही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही, हे विधान तुमचे निश्चितच धक्कादायक आहे. असंही अनिल पवार म्हणाले.
उडीद, मका, मुगाची खरेदी कमी दराने करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, तिकडेही तुमचे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे होऊन व्यापाऱ्यांची तळी उचलण्याचे काम तुम्ही करत आहात. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी हुमणीच्या विळख्यात सापडलेला आहे, असे असताना आपल्या खात्याने त्याकडे ढुंकून देखील पाहिले नाही. राजू शेट्टींनी स्वतःसाठी मंत्रीपद न घेता मरळोबावाडीच्या ४३ गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोराला मंत्रीपद दिलयं, हे तुम्हीच शिरोळच्या सभेत सांगितला होता. हे विसरून नका. असा टोलाही अनिल पवार यांनी लगावला आहे.
COMMENTS