नांदेड – धनगर समाजाला आरक्षण देणार, असे सांगत भाजपाने सत्ता काबीज केली. मात्र गेल्या चार वर्षांत भाजपा सरकारने धनगरांची उपेक्षाच केली. माळेगावचा जागृत खंडोबाराया तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अशी टीका धनगर समाजाच्या नेत्या आणि राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली आहे.
श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाच्या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धनगर आरक्षण ललकार महामेळाव्यात त्या बोलत होत्या. सलगर यांनी धनगर आरक्षणावरून भाजपाला चांगलेच लक्ष्य केले.
सलगर म्हणाल्या, भाजप सत्तेत नव्हता तेव्हा त्यांना धनगर समाजाचा फारच पुळका होता. आमचे सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आरक्षणासाठी धनगर समाजाने भाजपला मते दिली. पण तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात केला. भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
COMMENTS