पुणे – ‘संभाजी ब्रिगेडनं’ पुण्यातील सर्व लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. शेतकरी, कष्टकरी श्रमिक सुशिक्षित बेरोजगार तरुण, छोटे मोठे लघुउद्योग, मध्यम व्यापारी, सामान्य नागरिक यांना उध्वस्त करून संपवण्याचे काम केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारने केले आहे. आरक्षण नोकऱ्या नवीन उद्योग व्यवसाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, मुलभुत विकास कामे आदी करण्यात देशातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. विरोधकांचे हात भ्रष्टाचार व घोटाळ्यात दगडाखाली अडकल्यामुळे सरकारच्या विरोधात बोलायला हतबल आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हक्कासाठी बोलायला व सभागृहात भांडायला कोणीही उरले नाही. सगळे मोदींच्या दहशतीखाली वावरत आहेत. राज्यासह देशात प्रस्थापित घराण्यांचे व जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे राजकारण सुरू असून राजकारणात स्वच्छ चारित्र्याच्या तरुण चेहऱ्यांना संधी द्यायला तयार नाहीत. संभाजी ब्रिगेड ती जागा भरून काढणार असुन प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या जोरावर पुण्यातील सर्व लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
तसेच राजकारणात चांगल्या कामातून संभाजी ब्रिगेड स्वतःची ‘स्पेस’ निर्माण करणार आहे. शेतकरी प्रश्न, दारूबंदी, तरुणांना रोजगार, महागाई, झोपडपट्टी विरहित शहर, पाणी प्रश्न चांगले रस्ते व वाहतूक सेवा, धर्मनिरपेक्ष समाज. आदी मुलभूत प्रश्नांवर संभाजी ब्रिगेड भर देणार असल्याचंही संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील ३० लोकसभा व १०० विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार आहे. लोकसभा व विधानसभेच्या जागेवर महिलांना 50 टक्के जागा देऊन महिलांना जास्तीत जास्त संधी देणार आहे. ‘दारू मुक्त गाव व शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव…’ आणि १००% समाजकारण व १००% राजकारण…’ हे ब्रिद घेऊन संभाजी ब्रिगेड शेतकरी व तरुनांच्या मूलभूत प्रश्नावर रणांगणात उतरणार असल्याचं मत संभाजी ब्रिगेड’चे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार आहे. पुणे शहर जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडकडे इच्छुक उमेदवार तयार आहेत आपल्या विचारांचे सरकार आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड चांगला पर्याय असून लोक संभाजी ब्रिगेडकडे सक्षम पर्याय म्हणून पाहत आहेत. नवीन मतदारांचे हक्काचे आवाज म्हणून संभाजी ब्रिगेड कडे ओढा वाढत आहेत. म्हणून सामान्य नागरिकांचा हक्काचा आवाज संभाजी ब्रिगेड होणार असून 2019 ची पुणे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच आगामी मनपा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकाही लढवणार असून ‘गाव (उपनगर) तिथे संभाजी ब्रिगेड आणि घर तिथे कार्यकर्ता अशी संघटन बांधणीचे काम सुरू केले असून उमेदवारांची नावे वेळीच जाहीर केली. जातील राजकीय बदल निश्चित आहे. यासंदर्भात आज पुणे येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री. मा. किरणराज घाडगे व जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
यावेळी पत्रकार परिषदेला पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री. मा. किरणराज घाडगे, संभाजी ब्रिगेड’चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे सचिन आडकर, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, कार्याध्यक्ष शिवाजी पवार, चित्रपट आघाडी अध्यक्ष प्रकाश धिंडले, शहर संघटक विवेक तुपे, संजय चव्हाण, मारूती चव्हाण, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS