मुंबई – सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर करणात आला आहे. या दोन्ही महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होणार असून 1 ऑगस्टला हे मतदान घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. तसेच वसई-विरार महानगरपालिकेच्या एका रिक्त पदासाठी देखील मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी होणार असून त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
सांगली महानगरपालिका
दरम्यान सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत दि. 13 ऑगस्ट 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 2 हजार 793 असून मतदारांची संख्या सुमारे 4 लाख 23 हजार 366 इतकी आहे. याठिकाणी एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 21 जागा राखीव आहेत.
जळगाव महानगरपालिका
जळगाव महानगरपालिकेची मुदत 19 सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 60 हजार 228 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 65 हजार 15 इतकी आहे. एकूण 19 प्रभागातील 75 जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी महिलांसाठी 38 जागा राखीव आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4 , तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव असल्याची माहिती निवडणूक योगानं दिली आहे.
दरम्यान वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 97 च्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी दि. 4 जुलै 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होणार असून 1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
COMMENTS