“मी तासगाव- कवठे महांकाळमधून निवडणूक लढण्यास तयार”, केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घोषणा!

“मी तासगाव- कवठे महांकाळमधून निवडणूक लढण्यास तयार”, केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घोषणा!

सांगली – आगामी विधानसभा निवडणूक मी तासगाव- कवठे महांकाळमधून लढण्यास तयार आहे अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी केली आहे. त्यामुळे सीमा आठवले यांना युतीकडून उमेदवारी दिली तर त्यांचा सामना विद्यमान आमदार आणि दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्याशी होणार आहे.

तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुमन पाटील या आमदार आहेत. आताही राष्ट्रवादीकडून सुमन पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु सुमन पाटील यांना थेट आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी तासगाव- कवठे महांकाळमधून लढण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणू, अशी ग्वाही देखील सीमा आठवले यांनी दिली आहे. दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजुरांचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात पूर्णत्वास नेण्यासाठी लक्ष घालणार आहे. तसेच महिलांच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन महिला आघाडीने प्रयत्न केले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तासगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

COMMENTS