सांगली: सांगली महापालिका नेहमीच राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. पालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे. महापौर पदासाठी महाविकास आघाडीकडून मैनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सूर्यवंशी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता मोहिते, स्वाती पारधी यांनी अर्ज भरले आहेत. भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचा महापौर पदासाठी, तर गजानन मगदूम यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल झाला आहे. महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस आघाडीकडून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यात राष्ट्रवादीने टाकलेल्या जाळ्यात अडकलेले भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल असून, त्यामुळे भाजपच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे.
सांगली महापालिकेत ४३ नगरसेवकांच्या बळावर गेली अडीच वर्षे भाजपची सत्ता आहे. महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी महापौर आणि उमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी विशेष ऑनलाइन सभेद्वारे होणार आहे. अर्ज भरताच भाजपचे नगरसेवक संपर्काबाहेर गेले आहेत. हे नगरसेवक काँग्रेस आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यामुळे सध्या काँग्रेस आघाडीकडे ३९, तर भाजपकडे ३६ नगरसेवक असून, दोन नगरसेवकांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. राज्यातील सत्तेचा पुरेपूर फायदा घेत राष्ट्रवादीने भाजपच्या १२ नगरसेवकांना गळाला लावले होते.
मात्र त्याला अजून यश आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही अस्वस्थ आहेत. सध्या आघाडीकडे ३९ नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे महापालिकेत सत्ता परिवर्तन होणार, की सत्ता राखण्यात भाजपला यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
COMMENTS