मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भुमिका घेतल्याने शिवसेनेतील नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे संजय राठोड राजीनामा देण्याची लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. धनंजय मुंडे, नवाब मलिक यांना विविध प्रकरणात कोंडीत पकडून हाती काहीच लागले नाही. त्य़ात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी काही व्हाईस काॅल समोर आले असून त्यामध्ये वनमंत्री संजय राठो यांचे नाव पुढे येत आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे. पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
COMMENTS