अखेर मातोश्रीवरून निघाला आदेश

अखेर मातोश्रीवरून निघाला आदेश

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. विधीमंडळाच्या आधिवेशनापूर्वी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि महिला मोर्चाच्यावतीने घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होणार असल्याने अखेर आज मातोश्रीवरून संजय राठोड यांना राजीनामाचा आदेश आल्याचे समजते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यामध्ये शिवसेना नेते संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा भाजपने आरोप केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी वारंवार शिवसेना आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी काही कडक निर्बंध लागू केले असताना संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राठोड यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

त्यात अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला घेरण्याचे नियोजन केले असताना मातोश्री या बंगल्यावरून आज वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. संजय राठोड प्रकरणावरुन सरकारची नामुष्की झाल्यामुळे हा मोठा निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS