क्लिनचीटनंतर संजय राठोडांचे पुनर्वसन?

क्लिनचीटनंतर संजय राठोडांचे पुनर्वसन?

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाला. भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढल्याने राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, शिवसेनेतील अनेक नेते राठोड यांच्या सोबत असून राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. तसेच राठोड यांचे चौकशीनंतर पुनर्वसन केले जाणार असल्याचे पक्षातून सांगण्यात येते.

बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला ‘संत गाडगे बाबा विमानतळ’ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं. अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. Dयापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होते. विदर्भातील या महत्वाच्या नेत्याला महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री पद देण्यात आले.

राज्याचे वनमंत्री व बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांंच्या वर्षा निवासस्थानी आणि सह्याद्री अतिथीगृहावर मोठी ड्रामेबाजी झाल्याचे समजते. शिवसेनेत राठोड प्रकरणी दोन मतप्रवाह होते. राठोड यांच्या कथित ध्वनिफीत संभाषणबाबतचा फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप आलेला नाही, तो आल्यानंतर व गुन्हा नोंद झाल्यावर राजीनामा घ्यावा हा एक मतप्रवाह आणि राठोड यांचा राजीनामा घेतल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावेल म्हणून घेऊ नये, असा दुसरा मतप्रवाह होता. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आग्रहामुळे राजीनामा घेतल्याचे सांगण्यात येते. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना पाठीशी घातले.
रात्री साडेआठ पर्यंत मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने संजय राठोड यांचा राजीनामा राजभवनकडे सुपूर्त केलेला नव्हता. राठोड यांचे काढलेले वन मंत्रालय मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे ठेवले आहे. याचाच अर्थ राठोड यांना क्लिनचीट मिळाल्यानंतर पुनर्वसन होऊ शकते, अशी शिवसेनेतील सूत्रांची माहिती आहे.

COMMENTS