मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल आमचे मार्गदर्शक असून ही एक सदिच्छा भेट होती. राज्यपाल यांच्याशी जुने संबंध आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले असं विचारलं असता, राज्यपाल प्रियच असतात, ते राज्याचे पालक असतात असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधही अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकार खूप काही करत आहे. विरोधी पक्ष एका बेटावर आहे. त्यांना काही दिसत नसेल. राज्यपलांना सरकार किती काम करत आहे याची पूर्ण माहिती असते. सरकार त्यांना माहिती देत असतं. आंदोलन करणं अधिकार आहे. पण असं राजकीय आंदोलन करणं योग्य नाही, सरकारसोबत उभं राहिलं पाहिजे. जे मुद्दे आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडत चर्चा केली पाहिजे असंही राऊत यांनी भाजपच्या आंदोलनावर म्हटलं आहे.
या भेटीदरम्यानचा संजय राऊत आणि राज्यपालांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी राज्यपालांना झुकून नमस्कार केला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
COMMENTS