मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भेट घेतली. आज सकाळी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. सध्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याची चर्चा आहे. अशातच संजय राऊत शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
अमित शाह आल्यावर तिढा सुटणार ?
शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा आता अमित शाह मुंबईत आल्यानंतरच सुटेल, अशी माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून सत्तावाटपाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यानुसार शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह 8 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपदे देण्यात येतील. गेल्यावेळपेक्षा शिवसेनेला दोन मंत्रिपदे जास्त मिळणार आहेत. याशिवाय, केंद्रातही शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद वाढवून मिळेल. तर भाजप स्वत:कडे 23 मंत्रिपदे ठेवेल, अशी अटकळ आहे. त्यामुळे भाजपची ही ऑफर शिवसेना मान्य करणार का? हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS