मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहूमतापासून थोडे लांब आहेत. काँग्रेस जेडीएस एकत्र आले तर तेही बहुमताच्या जवळ पोचताहेत. त्यांनी सत्तास्थापनेसाठी दावा केला असेल तर राज्यपालांना निर्णय घेताना फार त्रास होईल. सत्ता स्थापनेचा नैतिक दावा हा भाजपचा असायला हवा कारण आज कर्नाटकमध्ये तो सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावणे ही घटनेनुसार प्रथा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांत काँग्रेस-भाजपकडून या प्रथा पाळल्याच गेल्या आहेत असं दिसत नाही. गोवा-मणिपूरमध्ये असे निर्णय घेतले गेले नाहीत. पण कर्नाटकमध्ये परिस्थिती वेगळी आहे. ते मोठं राज्य आहे. त्यामुळे लहान राज्यातले निर्णय वेगळे आणि मोठ्या राज्यातले निर्णय स्थिरतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यामुळे राज्यपालांसमोर काँग्रेस आणि जेडीएस मिळून 116 आमदार उभे राहिल्यास त्यांच्यासाठी मोठा पेच असेल की सत्ता स्थापन करण्यास कुणाला द्यावी ? सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला की काँग्रेस-जेडीएस ? जर राज्यपाल रामशास्त्री असतील तर ते नक्कीच त्यापद्धतीनं निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच जनतेनं जेडीएस किंगमेकर करण्याऐवजी थेट किंगच केलंय. कुमारस्वामी कदाचित मुख्यमंत्रीही होऊ शकतील. लोकशाहीत दुर्दैव की निवडून आलेला मोठा पक्ष विरोधी बाकांवर बसतो आणि छोटा पक्ष त्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भाजपचं सत्ता टिकवणे आणि विकत घेण्याचं राजकारण पाहता जेडीयू फुटुही शकते. त्याबाबतीत भाजपचं राजकारण काँग्रेसपेक्षा वरचढ असल्याचही राऊत यांनी म्हटलं आहे.
जेडीएसला पाठिंबा ही काँग्रेसची धूर्त खेळी आहे. यापुढे 24 तासांत आणखी खेळी होतील. या खेळीत मोदी-शाह वरचढ ठरतील. तरीही असं वाटतंय काँग्रेस-जेडीएस मिळून 116 डोकी पुढे उभी राहिल्यास राज्यपालांनी त्यांना सरकार बनवण्याची संधी दिली नाही तर उद्याच्या पार्लमेंटमध्ये त्याचे पडसाद उमटतील. संसदेचे कामकाज बरेच दिवस ठप्प होईल असा अंदाजही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS