मुंबई – मंत्रिमंडळातील विस्ताराबाबत काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या खातेटपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबतची शक्यता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज सकाळीच व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महाविकास आघाडीचं खातेवाटप जवळपास निश्चित झालं असून महत्त्वाचं असं गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळतील असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. तसेच संजय राऊत यांनी महसूल खाते काँग्रेसला तर अर्थखाते राष्ट्रवादीला मिळण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे फडणवीस सरकारप्रमाणेच ‘मुख्यमंत्रीच गृहमंत्री’ या पॅटर्नची
पुनरावृत्ती होण्याची चिन्हं आहेत.
तसेच 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबर अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु 9 किंवा 12 डिसेंबररोजीही विस्तार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहो. जर अधिवशनापूर्वी विस्तार झाला नाही तर अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सात मंत्रीच दिसणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात जणांनी 28 नोव्हेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हं आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे पुन्हा उद्योग मंत्रालयाचीच धुरा दिली जाऊ शकते. तसेच काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सोपवला जाण्याचे संकेत आहेत. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हं आहेत.
COMMENTS