मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे जाणार आहेत. मुंबईत ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात दुपारी चार वाजता ही मुलाखत होणार आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कतरीना कैफ आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संजय राऊत मुख्यमंत्र्यांना कोणते प्रश्न विचारणार आणि त्यांचं उत्तर मुख्यमंत्री कशापद्धतीनं देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाबाहेरच्या राजकीय नेत्याची मुलाखत घेणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीही पहिल्यांदाच एखाद्या शिवसेना नेत्याला जाहीर मंचावर सामोरे जाणार आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून अनेकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली जाते. हीच तोफ या मुलाखतीत डागली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच आगामी काळात होणा-या निवडणुकांबाबत शिवसेनेकडून भाजपवर अनेकवेळा जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यामुळे या मुलाखतीतही संजय राऊत हे आक्रमक प्रश्न विचारणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS