मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते.सरदार तारा सिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग अनेक वर्ष प्रतिनिधित्त्व केले होते. मुलूंड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
दरम्यान प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. गेल्यावर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती. तारासिंह यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू केला होता. तारासिंह यांनी मुलुंड विधानसभेचं दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केलं. २०१८ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता. तारासिंह यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
COMMENTS