मुंबई – सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे. राज्याच्या विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Bye Election to 45-Satara निवडणूक आयोगाचं पत्र
दरम्यान माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. भाजपात जाण्यापूर्वी उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे साताऱ्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपात गेल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक होणार असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात होता. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना साताऱ्याचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे साताऱ्याची विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आज अखेर या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
COMMENTS