सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आज साताय्राच्या दौय्रावर आहेत. पवार हे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी साताऱ्यात गेले असल्याची माहिती आहे.या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी शरद पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिवेंद्रसिंह राजे देखील उपस्थित होते. विशेषण म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतः शिवेंद्रसिंहराजे यांनी गाडी चालवली आहे. त्यामुळे या दोन्ही राजेंमधील वाद आता मिटला असल्याची चर्चा आहे. तसेच उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीकडून आठ उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या यादीमध्ये उदयनराजे यांचं देखील नाव आहे. त्यानंतर आज उदयनराजे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे उदयनराजे यांनाच याठिकाणाहून उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीकडून निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी?
साता-यातून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती आहे. तसेच माढातून विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार असून गोंदिया – भंडा-यातून मधुकर कुकडे, बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच शिरुरमधून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा, तर मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचे नाव निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
COMMENTS