लोकसभा निवडणूक जवळपास वर्षभरावर आली असल्यामुळे सर्वच पक्षात उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वात सुरक्षित बालेकिल्ला असेलेल्या सातारा मतदारसंघात उमेदावर बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल कराडमध्ये सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याशी केलेली बंददार चर्चा. कोल्हापूरच्या दौ-यावरुन परतत असताना काल शरद पवार यांनी पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददार जवळपास अर्धातास चर्चा झाली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
साता-यात सध्या उदयनराजे भोसले खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी झाले होते. त्यांचा करीष्मा आणि राष्ट्रवादीची ताकद यामुळे त्यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याशीं त्यांचं फारसं पटत नाही. शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. अजित पवारांशीही त्यांचं फारसं पटत नाही. त्यातच वेळोवेळी उदयनराजे यांनी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी एखादा तगडा उमेदवार द्यावा अशी राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांची भूमिका असल्याचं बोललं जातंय. त्यादृष्टीने काल पवारांनी श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी केल्याचं बोलंलं जातंय.
श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिल्यास सातारा विधानसभा वगळता इतर पाचही मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळेल असा पक्षाचा कयास आहे. राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. उच्चशिक्षीत आणि पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात ते परिचयाचे आहेत. शरद पवारांचे शालेय मित्र आणि अत्यंत विश्वासू म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो अशी शक्यता आहे. दुसरीकडे उदयनराजे यांचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे संबंध चांगले नसले तरी शरद पवारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पवार नेमके काय करतात ते पहावं लागेल.
COMMENTS