मुंबई – सत्ता स्थापन करण्यासाठी अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून बसली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या याच रस्सीखेचबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे. सत्यजित तांबे यांची जशास तशी फेसबूक पोस्ट….
अडीच-अडीच वर्षांच्या निमित्ताने…
प्रिय आदित्यजी,
2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.
मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, ‘सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल’. पुढे सर्व जिल्हा मला ‘भावी अध्यक्ष’ म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या.
पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.
हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.
आपलाच,
सत्यजीत तांबे
अडीच-अडीच वर्षांच्या निमित्ताने… प्रिय आदित्यजी,2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर…
Posted by Satyajeet Tambe on Monday, October 28, 2019
COMMENTS