मुंबई मनपा निवडणुकीच्या अगोदर भाजपला मोठा झटका

मुंबई मनपा निवडणुकीच्या अगोदर भाजपला मोठा झटका

मुंबई – राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती असतानाही २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनेचे ८४, भाजप ८३ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसचे ३१ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपने विरोधी पक्षनेत्याचे पद स्वीकारण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका भाजपने स्वीकारली होती. त्यामुळे ते पद तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसकडे गेले. दरम्यान, शिवसेनेने भाजपची साथ सोडून काॅंग्रेस आघाडीचा हात धरला. त्यानंतर भाजपकडून विरोधीपक्षावर दावा सांगतला होता. तो मुंबई उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर भाजपला मोठा झटका बसला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनमानी निर्णय घेत आपला विरोधी पक्षनेतापदाचा दावा फेटाळून लावला, असा आरोप करत भाजपचे नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी त्या निर्णयाला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. त्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेसचे रवी राजा यांनाही नंतर याचिकादारानी प्रतिवादी केले होते. अखेरीस सुनावणीअंती हायकोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावली होती. त्याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. मात्र, त्यावरील सुनावणीअंती आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने शिंदे यांचे अपिल फेटाळून लावले.

संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता. या पदासाठी व पालिकेतील गटनेतेपदासाठी भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसकडे आधीपासूनच विरोधी पक्षनेतेपद असल्याचे नमूद करत व पालिकेच्या नियमांच्या आधारावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळून लावला होता. महापौरांच्या या निर्णयाला भाजपकडून शिंदे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली होती होती व महापौरांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. मुंबई पालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असून त्याआधी भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आता पालिकेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार हेसुद्धा आज स्पष्ट झाले आहे.

COMMENTS