विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी सेनेच्या आमदारांना व्हीप जारी

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी सेनेच्या आमदारांना व्हीप जारी

प्रसाद लाड यांनाच मतदान करण्याचे आदेश

मुंबई – नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या एका जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीचे प्रसाद लाड हे मैदानात असून प्रसाद लाड यांनाच मतदान करण्याचे आदेश शिवसेनेचे पक्ष प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

दरम्यान विधानसभेतील सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.त्यासाठी सुनील प्रभू यांच्याकडून निवडणुकीच्या पूर्वसंध्येला   ताज हॉटेलमध्ये स्नेहभोजन देण्यात येणार आहे. या भोजनासाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत असून काँग्रेसचे दिलीप माने हे प्रसाद लाड यांच्याविरोधात उभे आहेत. त्यामुळे प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. सेना-भाजप आणि काँग्रेसनं कंबर कसली असल्यामुळे नक्की कोणाला यश मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS