कर्नाटक – कर्नाटकमधील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठी सिद्धरामय्या सरकारनं निर्णय घेतला आहे. परंतु याबाबत केंद्रातील भाजप सरकारनं मात्र विरोध केला आहे. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देणं म्हणजे हिंदूंचं विभाजन करण्याचं पाऊल असून लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्याचा हा डाव असल्याचं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसेच ”लिंगायत समाजाचं विभाजन होऊ देऊ नका अशी लिंगायत समाजातील अनेक महंतांची मागणी असल्याचंही शाह यांनी म्हटलं आहे. तसेच हे विभाजन होणार नसून जोपर्यंत भाजपा आहे तोपर्यंत कोणतंही विभाजन होणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकार मान्य करणार नसल्याचं अमित शाह यांनी महंतांसोबत बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याबाबतचं भिजत घोंगडं कायम असल्याचं दिसून येत आहे. लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५,२८,२९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील. कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के आहे.
COMMENTS