मुंबई – राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा. ग्रामीण भागावर विशेष लक्ष्य केंद्रीत करुन युवकांना कौशल्य आधारीत प्रशिक्षण द्यावे, असे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मंत्रालयात दि. 15 जानेवारी, 2020 रोजी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाची पहिली आढावा बैठक राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घेतली. कौशल्य परिवर्तन कक्ष, कौशल्य सारथी कक्ष आणि कौशल्य निर्माण उद्योजकता व नाविन्यता कक्ष यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.
श्री. देसाई म्हणाले, कृषी केंद्रीत योजनांचा अभ्यास करुन द्राक्ष, ऊस, फळबाग यासारख्या पिकांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागाने रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा. तसेच बेरोजगारांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य योजना-RPL (विशेष कृषी प्रकल्प), दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, प्रमोद महाजन कौशल्य अभियान, जिल्हास्तरीय ‘किमान कौशल्य कार्यक्रम’ या योजनांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसचिव श्री. खरात, श्री. मांडवे हे उपस्थित होते.
COMMENTS