नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपाने कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना यामध्ये कधीच यश मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे असं वक्तव्य आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपावर टोलेबाजी करत टिकास्त्र सोडलं आहे. आधी त्यांना दोन महिन्यात सरकार पाडायचं होतं, मग सहा महिन्यात सरकार पाडणार होते, आठ महिन्यातही सरकार पाडणार होते. पण यापैकी काहीही होऊ शकलं नाही असंही पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, ईडीमार्फत करण्यात येणारी कारवाई हा सत्तेचा दुरुपयोग आहे. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारधारा भिन्न असल्याने हे सरकार पडेल असं भाजपाला वाटत होतं. मात्र तसं झालं नाही.”
२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपाने निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाल्याने दोन्ही पक्षांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्ता काबीज केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर भाजपाने हे सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीही प्रयत्न करणार नाही हे सरकार अंतर्विरोधाने पडेल अशी टीका भाजपाने वारंवार केली. मात्र आता शरद पवार यांनी भाजपावर टीका करत महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षांसाठी स्थिर आहे. सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS