मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा, लॉकडॉऊन वाढवताना नियम आणि अटींवरही चर्चा करण्यात आली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते.
दरम्यान देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.मुंबईची स्थिती आणखी वाईट आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवीन प्रकरणं सापडली आहेत. तर, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा पाहून मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. एकट्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे. गेल्या तासांत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे. यामुळे साखर उद्योग डबघाईस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर उद्योगाला पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासोबतच साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारला 5 उपाय सुचवले आहेत. यावरही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
COMMENTS