मुंबई – रायगड दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर केली असून पंचनामे झाल्यानंतर अंतिम मदत जाहीर करु असं सांगितलं आहे. त्यानंतर लगेचच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर काय घोषणा केली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केला. निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे. घरे पडली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत. होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी थळ येथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हे देखिल त्यांच्याबरोबर होते.
पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना रायगडमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. यावेळी रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही सुरुवात आहे. त्याला पॅकेज म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
COMMENTS