पुणे – आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अखेर निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी माढा मतदार लोकसभा संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी मी कोणत्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही. आत्तापर्यंत मी एकदाही निवडणूक हरलेलो नाही. त्यामुळे या निवडणुकीलाही सामोरं जाण्यास मला आवडलं असतं. मात्र एकाच कुटुंबातल्या किती जणांनी लोकसभा लढवावी? याला मर्यादा असली पाहिजे. त्यामुळेच मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असंही शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान कुटुंबातही मी चर्चा केली. मी स्वतः उभं न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे. एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभं रहावं याला काही मर्यादा असाव्यात असं मला वाटतं त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS