शरद पवारांच्या सुचनेची धनंजय मुंडेंकडून तात्काळ दखल !

शरद पवारांच्या सुचनेची धनंजय मुंडेंकडून तात्काळ दखल !

'त्या' वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला दिले आदेश

परळी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या त्यांच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान हातावर पोट असलेल्या वर्गाला मदत केली पाहिजे अशी भूमिका मांडली. या सुचनेची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध घटकांचे या संकट काळात होत असलेले नुकसान टाळता यावे व त्यांना साहाय्य करता यावे याबाबत मुंडेंनी सामाजिक न्याय विभागाकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर हातावर पोट असणारा, उदा – गटई कामगार, लघु उद्योजक असा आहे. विभागा अंतर्गत येणा-या महामंडळाकडून ज्या घटकांना मदत केली जाते ते, तसेच कर्ज दिले जाते ते लघु उद्योजक यांचे या संकट काळात मोठे नुकसान होणार आहे.

त्यामुळे या घटकांचे होणारे नुकसान टाळणे व त्यांना काय मदत करता येऊ शकते याबाबत अभ्यास करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आजच मुंडेंनी विभागाला दिले आहेत .

सदर प्रस्ताव प्राप्त होताच पवार साहेबांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या घटकांना विशेष सहाय्य करण्याबाबत निर्णय होईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

COMMENTS