मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पवार यांनी माध्यमांशी बोलताना माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे वृत्त माध्यमांनी प्रकाशित केले होते. एनडीए बहुमत मिळवण्यास अपयशी ठरली, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्याचे माध्यमांनी प्रकाशित केले होते.
परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांचे नाव घेतले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. यासाठी संसदेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाठवणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
COMMENTS