…मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते, शरद पवारांचं भावनीक पत्र, काय म्हणालेत पत्रात कोणाला लिहिलं पत्र!  वाचा

…मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते, शरद पवारांचं भावनीक पत्र, काय म्हणालेत पत्रात कोणाला लिहिलं पत्र! वाचा

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘बाईं’ना म्हणजेच त्यांच्या दिवंगत आईला एक भावनीक पत्र लिहिलं आहे. याबाबतची फेसबुकवर पोस्ट त्यांनी टाकली असून ते नेमकं या पत्रात काय म्हणालेत ते वाचा…

प्रिय सौ. बाई
साष्टांग नमस्कार,

पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व! मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे, काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिलं आहे. मग खचून जाण्याचा प्रহनच नव्हता.

मला चांगलं आठवतं. बैलानं मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिलं. ह्या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला.
हे करत असताना मला तरुणाईनं डोक्यावर घेतलं. मला नवा उत्साह मिळाला, मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं. नवं सरकार जेव्हा शपथ घेत होतं तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होतं. राजकीय धामधुमी कमी झाली तसं कोरोना महामारीचं संकट ओढवलं. त्यातून अद्याप दिलासा नाही पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय.

बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच १९३५ साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्हं मूल कडेवर घेऊन, खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जायचात. कळत-नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.

बाई, तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती. मी मात्र गांधी-नेहरू-यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे ओढलो गेलो. तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर लादले नाहीत. राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली. माझ्या पंच्चाहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कारप्रसंगी मा. राष्ट्रपती, आजी-माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्वपक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचे फलित आहे असे मी मानतो. त्या सत्कारप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती.

बाई! कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी ह्या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वत:च्या आवडी-निवडी नुसार निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले. आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठावूक आहे. ‘आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहेत, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो’ हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा.

आम्हा भांवडांसाठी तुम्ही घेत असलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे. सर्वात थोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले. आप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतली. अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वत:ची ओळख तयार केली. बापूसाहेबांनी लंडनला बोटीने जाऊन तिथे नोकरी करत इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. सूर्यकांतरावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. धाकटा प्रताप इंजिनियर तर झालाच परंतु त्याने वृत्तपत्र व्यवसायात देखील लौकिक मिळवला आहे.

बाई, तुम्ही बहिणींना सुद्धा शिक्षण दिलंत. त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत.

तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलंत पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होतं. पण मी राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री मिळाली तेव्हाही नव्हतात. भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते.

बाई, आज तुमची नातवंडं देखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तुम्हाला आम्हा भावंडा-नातवंडाकडे पाहून खूप-खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की. दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे. अधिक काही लिहित नाही. आपण व तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या.

तुमचा शरद

गोविंदबाग,बारामती, पुणे.
दिनांक – १२ नोव्हेंबर, २०२०

https://www.facebook.com/238463949663921/posts/1618602288316740/

COMMENTS